सन्मान बाबासाहेबांचा, जागर संविधानाचा!
नागपूर,दि.०९ नोव्हेंबर २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त आणि लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या गौरवशाली १५ वर्षांच्या प्रवासाचे औचित्य साधत, “सन्मान बाबासाहेबांचा, जागर संविधानाचा” या राज्यव्यापी वैचारिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम १५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांत पार पडणार असून, प्रत्येक ठिकाणी संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर घडविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे ठळक मुद्दे :
वेळ : दररोज सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत
जिल्हे : नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे, कोल्हापूर
समारोप : २६ नोव्हेंबर संविधान दिनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मंत्रालयाजवळ)
राज्यातील प्रख्यात बहुजन विचारवंत, इतिहासकार, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते या महाचर्चेत सहभागी होऊन भारतीय संविधानाच्या मुळ विचारांवर, लोकशाहीच्या मूल्यांवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानावर प्रकाश टाकणार आहेत.
लॉर्ड बुद्धा टीव्ही — विचारप्रकाशाचा प्रवास
२६ नोव्हेंबर २०१० रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून सुरू झालेला लॉर्ड बुद्धा टीव्ही आज भारतातील २२ राज्यांत २४ तास प्रसारित होत आहे.
बौद्ध धम्म, आंबेडकरी विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा दीप या माध्यमातून गेल्या १५ वर्षांत असंख्य घरांपर्यंत पोहोचला आहे. आज हे चॅनेल केबल, ओटीटी, मोबाइल अॅप, स्मार्ट टीव्ही आणि यूट्यूबच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहे.
प्रतिनिधींची बैठक संपन्न :
या भव्य उपक्रमाच्या तयारीसाठी लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्कच्या सर्व प्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण बैठक गोदिंया जिल्हा नावेगाव बांध येथे संपन्न झाली.यावेळी विनोद बागडे, सदाशिव गच्छे,गजेंद्र गवई,विकास कडलक,विनोद चांदमारे,मनोज मोडक,मिलिंद धनविजय,प्रशांत सोनवणे,रमेश खंडारे,दिनेश इखारे,प्रकाश सरदार,नुरुद्दीन जाविद,दिलीप बनकर,रवि साबळे,रुपेश गावंडे,प्रितम मानकर,राकेश रामटेके,आदि प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत राज्यातील सर्व जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला आणि वैचारिक महोत्सवाचे नियोजन, प्रचार आणि प्रबोधनात्मक सादरीकरण याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत मुख्य संचालक सचिन मून यांनी सर्व प्रतिनिधींना मार्गदर्शन करत सांगितले की —“भारतीय संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नाही, तर तो समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि बंधुभावाचा शाश्वत संदेश आहे.
बाबासाहेबांचा सन्मान आणि संविधानाचा जागर महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे हेच आमचे ध्येय आहे.”
लाॅर्ड बुद्धा टि.व्हि चे आवाहन:-
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने या प्रबोधनात्मक प्रवासात सहभागी व्हावे,
संविधानाच्या मूल्यांचा सन्मान करावा, आणि बाबासाहेबांच्या विचारांचा दीप आपल्या अंतःकरणात प्रज्वलित करावा!
लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून —
👉 सन्मान बाबासाहेबांचा, जागर संविधानाचा!





