चिंचवड,दि. ६ सप्टेंबर २०२५ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- गणेशोत्सवात भक्ती-उत्साहाबरोबर खबरदारीचाही मंत्र!
लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण शहर सज्ज असतानाच मोहननगरमध्ये काल रात्री दुर्दैवी अपघाताने गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडलं.
रामनगर-दत्तनगर-विद्यानगर सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकीत उभारलेल्या भल्या मोठ्या डीजे सेटअपचा काही भाग मोहननगर मनपा शाळेजवळील ट्रान्सफॉर्मरला धडकला. त्यातून दोन तरुण कार्यकर्ते थेट विजेच्या तडाख्याने खाली कोसळून गंभीर जखमी झाले. नागरिकांच्या तत्परतेमुळे त्यांना निरामय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असली तरी जीव धोक्यातून बचावला आहे.
यंदा महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छुक उमेदवारांनी मंडळांना देणग्यांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. पण या उत्साहात शिस्त, खबरदारी आणि जबाबदारी बाजूला पडली तर मोहननगरसारख्या घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
🔸 खबरदारीचा मंत्र:
डीजेवर ट्रॅक्टरवर उभं राहून नाचू नये.
ट्रान्सफॉर्मर-वीजवाहिन्यांच्या जवळ डीजे किंवा मिरवणूक न नेता सुरक्षित अंतर ठेवावे.
व्यसन टाळावे, नाचावरून किरकोळ वाद उकरू नये.
पोलिसांच्या सूचनांचा मान राखावा आणि सहकार्य करावे.
मिरवणुकीतील वाहनांमुळे अपघात होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.
नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
भक्ती, उत्साह आणि दिमाख या त्रिसूत्रीबरोबरच शिस्त आणि सावधगिरी हीच खरी गणेशभक्ती असल्याचा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे.
“भक्तीमय वातावरणात कुठेही गालबोट लागू नये हीच खरी गणरायाला अर्पण केलेली सेवा ठरेल”, अशी हाक शहरातील सर्व सार्वजनिक मंडळांना देण्यात आली आहे.





