Home ताज्या बातम्या “जनतेचा आक्रोश, प्रशासनाचे आश्वासन – पण कृती कधी?”

“जनतेचा आक्रोश, प्रशासनाचे आश्वासन – पण कृती कधी?”

0

मामुर्डी,दि.२८ ऑगस्ट २०२५( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- विकासनगर, किवळे परिसरातील नागरिक आज अक्षरशः संतापाने रस्त्यावर उतरले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष धम्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जनआक्रोश आंदोलन व ठिय्या आंदोलन धडाक्यात पार पडले. कारण साधं आहे – रोज हजारो नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणारे सांगवडे रस्त्यावरील खड्डे, पाण्यासाठी तडफडणाऱ्या सोसायट्या आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी भरलेला परिसर!

प्रमुख मागण्या :

मामुर्डी ते मासुळकर कॉलनी रस्त्याचे तातडीने डांबरीकरण व्हावे.

लिटिल अर्थ, कुणाल आयकॉन, गोदरेज, सिटी वन, अडरसन, आरबान, मासुळकर कॉलनीतील सर्वच सोसायट्यांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा.

प्रत्येक सोसायटीतून वेळेवर कचरा उचलला जावा.

रस्ते उद्ध्वस्त करणाऱ्या बिल्डर व आरएमसी प्लांट मालकांवर कारवाई करून त्यांच्याकडूनच दुरुस्ती करून घ्यावी.

पावसाळा संपेपर्यंत सर्व बांधकामांना ब्रेक लावावा व नवीन पाणी कनेक्शन रोखावे.

अधिकाऱ्यांची उपस्थिती पण आश्वासनांची पखरण :
महापालिकेचे उपकार्यकारी अभियंता स्वप्निल शिर्के, कनिष्ठ अभियंता संदीप खोत, आरोग्य निरीक्षक कांचन गौडा व पाणीपुरवठा अधिकारी प्रवीण धुमाळ हे आंदोलनस्थळी धाव घेतले.
त्यांनी नागरिकांना नेहमीसारखी गोड गोळी दिली –

“दोन दिवसांत खड्डे बुजवू, आठ दिवसांत डांबरीकरण करू.”

“कचरा आता नियमित उचलू.”

“किवळेची नवीन पाण्याची टाकी 15 दिवसांत सुरू करू.”

“आरएमसी प्लांटवर कारवाई करु.”

पण प्रश्न असाआजवर दिलेली किती आश्वासने प्रत्यक्षात आलीत?

आंदोलनकर्त्यांचा इशारा :
अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आंदोलनकर्त्यांनी आठ दिवसांसाठी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. पण, नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे –
👉 “जर आठ दिवसांत रस्ते डांबरीकरण झाले नाहीत, पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, आणि कचरा प्रश्न मार्गी लागला नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र व उग्र असेल.”

आंदोलनाचे नेतृत्व मा. धर्मपाल तंतरपाळे (उपाध्यक्ष, RPI पिंपरी-चिंचवड), मा. सिंधू धर्मपाल तंतरपाळे (अध्यक्ष, दिशा महिला संघटना), मा. दिलीपराव कडलक (ज्येष्ठ नेते, RPI कार्यध्यक्ष मावळ लोकसभा), श्री. राजेंद्र तरस (जिल्हा प्रमुख, युवासेना मावळ लोकसभा) यांनी केले.यावेळी परिसरातील अनेक मान्यवर व शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

💥 संतप्त नागरिकांचा सवाल –
पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांच्या मुलभूत गरजांसाठी प्रत्येक वेळी आंदोलनच का करावं लागतं? प्रशासनाला खड्डे, पाणी व कचरा दिसत नाही का? की आंदोलनाशिवाय डोळे उघडतच नाहीत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + 8 =