पिंपरी, दि. ४ जून २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकरी, टपरी-पथारी, हातगाडी धारक आणि फळभाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई सुरू आहे. नुकतीच दिघी येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईविरोधात टपरी पथारी हातगाडी पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बाबा कांबळे म्हणाले,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने २००७ साली देशातील पहिला फेरीवाला कायदा – हॉकर्स धोरण २००७ – लागू केला. या कायद्यासाठी आमच्या संघटनेचा मोठा वाटा आहे. त्यानंतर २००९ मध्ये महाराष्ट्र सरकारने आणि २०११ मध्ये केंद्र सरकारने फेरीवाल्यांच्या बाजूने कायदे केले. मात्र, या कायद्यांची अंमलबजावणी होत नाही आहे,आणि ती होत नसताना अतिक्रमण कारवाई सुरूच आहे. याविरोधात आम्ही नॅशनल हॉकर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. शरद राव यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दावे दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.सांगवी साहेब यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने निर्णय देत, जोपर्यंत फेरीवाला धोरणाची पूर्ण अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत कारवाई करू नये, असा आदेश दिला आहे. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्या आदेशाला केराची टोपी दाखवत कारवाई सुरूच ठेवली आहे.
ते पुढे म्हणाले, “महानगरपालिकेने कायद्याचे पालन करून फेरीवाल्यांना संरक्षण द्यावे. जोपर्यंत धोरणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत अतिक्रमण कारवाई थांबवावी. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि न्यायालयीन लढाई देखील लढू.”
यावेळी टपरी पथारी हातगाडी पंचायतचे सरचिटणीस प्रकाश यशवंते, दिघी-चऱ्होली विभाग अध्यक्ष रोहित तापकीर,दिघी मंदिर समितीचे खजिनदार बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.





