पिंपरी,दि.१९ नोव्हेंबर २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भारतीय बौद्धजन विकास समिती (पिंपरी–चिंचवड शहर) व संविधान अमृत महोत्सव सन्मान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधानाचे ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान जनजागृती निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या जागतिक संघर्षमय परिस्थितीत भारताने लोकशाही, समानता व मानवता या मूल्यांवर उभे राहून जगाला आदर्श दाखवला असून भारतीय संविधानाची गरज व महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या स्पर्धेचा उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या स्पर्धेसाठी चार विषय जाहीर करण्यात आले आहेत. त्यात भारताची अखंडता, संविधान आणि शेजारी देशांची परिस्थिती, भारतीय संविधानाशी नागरिकांचे नाते तसेच संविधान नसल्यास निर्माण होणारे परिणाम अशा विषयांचा समावेश आहे. निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत लिहिता येणार असून स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. निबंध लिहिण्यासाठी लागणारा पेपर आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्पर्धा गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होणार असून स्थळ मासूम संस्था – ELC संचालित Evening Learning School, सेक्टर क्र. २२, राहुल नगर, खाडे गार्डन, निगडी असे आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना समितीकडून प्रशस्तिपत्रक दिले जाणार असून विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांक – २००० रुपये, द्वितीय – १५०० रुपये, तृतीय – १००० रुपये, तर चौथा व पाचवा क्रमांक उत्तेजनार्थ ठेवण्यात आला आहे.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पार पडणार आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांनी रमेश जाधव (7507501039), आशा बैसाणे (9975772180) आणि सोमनाथ सर (8329827360) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.






