देगलूर,दि.३१ ऑक्टोबर २०२५ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी – प्रा. भिमराव दीपके):- देगलूर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर खानापूर सर्कलमधील राजकीय समीकरणांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. या मतदारसंघात अनुसूचित जाती महिला आरक्षण लागू झाल्याने भाजपकडून सक्षम आणि जनतेच्या मनात आपलेपणा जपणाऱ्या उमेदवार म्हणून सौ. दीक्षा देविदास वाघमारे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
सौ. वाघमारे या खानापूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य देविदास वाघमारे यांच्या पत्नी असून, त्या स्थानिक स्तरावर सामाजिक कार्यात सातत्य राखणाऱ्या आणि विकासाभिमुख दृष्टीकोन असलेल्या महिला म्हणून ओळखल्या जातात. तर श्री. देविदास वाघमारे हे गेल्या तीन दशकांपासून बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असून, खानापूरसह आसपासच्या इब्रामपूर, अल्लापूर, सुगाव, तडखेल, मनसक्करगा, लक्खा, देगाव, सुंडगी, वन्नाळी, वझरगा, चेनपूर या गावांमध्ये शेकडो कामगारांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. या माध्यमातून त्यांची सामाजिक बांधिलकी आणि लोकाभिमुख वृत्ती ठळकपणे दिसून येते.
राजकारणातही वाघमारे दांपत्य सक्रिय भूमिका बजावत असून, देविदास वाघमारे हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्षातील विविध पदांवर काम करत नांदेड जिल्हा भाजपा अनुसूचित जातीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आणि सध्या देगलूर तालुका भाजपा चिटणीस म्हणून आपली छाप पाडली आहे.
दरम्यान, सौ. दीक्षा वाघमारे यांच्या उमेदवारीस राज्यसभा खासदार अजितदादा गोपछेडे यांचे विश्वासू, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि नांदेड जिल्हा भाजपा चिटणीस अनिल पाटील खानापूरकर यांचा ठाम पाठिंबा लाभला आहे. या पाठबळामुळे भाजपमध्ये त्यांच्या नावाला विशेष वजन प्राप्त झाले असून, वाघमारे दांपत्यांच्या राजकीय पावलांवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
खानापूर परिसरात जनतेत वाघमारे कुटुंबाविषयी “आपलेपणाची भावना” आणि विकासावर विश्वास दिसून येत आहे. त्यामुळे भाजपने जर सौ. दीक्षा वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवून अधिकृत उमेदवारी दिली, तर या भागात पक्षाचे बळ अधिक वाढेल, असा स्थानिक राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.



