चिंचवड,दि.१९ सप्टेंबर २०२५( प्रजेचा विकास ऑनलाईन न्यूज प्रतिनिधी):- वृद्ध प्रवासी महिलांना कारमध्ये बसवून चाकूचा धाक दाखवत तब्बल ८.४७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून लुटलेले दागिने व वापरलेली कार असा एकूण १४.१७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजीदुपारी ३ ते ४.३० वाजता दरम्यान, भुजबळ चौक, वाकड बसस्टॉप येथून दोन वृद्ध महिला (वय ७२ व ७५ वर्षे) यांना लाल रंगाच्या होंडा सिटी कारमध्ये बसवण्यात आले. आरोपींनी महिलांना वाकड ब्रिज ते नवीन कात्रज बोगदा परिसरात फिरवून चाकूचा धाक दाखवत सोन्याची चैन, बांगड्या व अंगठ्या असे १२७ ग्रॅम वजनाचे, ८.४७ लाख रुपये किंमतीचे दागिने जबरी चोरी करून फरार झाले. याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व सततच्या पाठपुराव्यानंतर आरोपींचा शोध घेतला.
दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरातून आरोपी
1. आबासाहेब अंकुश मदने (३५, रा. विकासनगर, देहुरोड)
2. कैलास पांडुरंग टॉन्पे (३२, रा. गायकवाड नगर, दिघी)
3. वैभव जनार्दन सुर्यतळ (३०, रा. लक्ष्मीनगर, रावेत)
यांना शिताफीने अटक करण्यात आली.त्यांच्याकडून ८.४७ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने
५.७० लाख रुपये किंमतीची होंडा सिटी कार आसा एकूण १४.१७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी आबासाहेब मदने याच्यावर यापूर्वीही भादंवि कलम १७०, ४१९, ४२० अंतर्गत बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, गुन्हे उप-आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सपोआ (गुन्हे-१) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोउपनि भरत गोसावी, मयुरेश साळुंखे, सपोउपनि प्रविण दळे यांच्यासह गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकातील पोलिसांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
सदर आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाणे करीत आहे.



