देहरोड, दि.२७ ऑगस्ट २०२५( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी) :-देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांच्या हालअपेष्टा थांबण्याचे नाव घेत नाहीत. पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, आरोग्य सुविधा यांसारख्या मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर तोडगा म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) तर्फे कॅन्टोन्मेंटमधील ७ वॉर्डांचा समावेश देहू नगरपरिषदेत करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात पुणे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सचिव अक्षय अनिरुद्ध चोपडे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित दादा पवार यांना (दि.५) रोजी निवेदन दिले. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. सचिनजी खरात उपस्थित होते.
नागरिकांचे हाल :
पाण्यासाठी नागरिकांना अजूनही टॅंकरवर अवलंबून राहावे लागते.
रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की, पावसाळ्यात चिखल व खड्डे आणि उन्हाळ्यात धूळच धूळ.
आरोग्य सेवा जवळजवळ शून्य, तातडीने उपचार न मिळाल्याने धोका वाढतो.
शैक्षणिक व सामाजिक सुविधा अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांचेही नुकसान.
“प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा” – अक्षय चोपडे
“कॅन्टोन्मेंट प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले जात आहे. म्हणूनच या वॉर्डांचा देहू नगरपरिषदेत समावेश करून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. हा आमचा ठाम आग्रह आहे.” महानगरपालिकेत गाव समाविष्ट झाले तर आम्हाला सर्वांना खूप मोठा भुरदंड भोगावा लागेल, मात्र देहू नगरपरिषद मध्ये गाव समाविष्ट झाली तर ग्रामपंचायती सारखे देहूरोड कॅन्सरमेन्टला देखील चांगले दिवस येतील असे अक्षय चोपडे यांनी सांगितले.
“हा नागरिकांचा न्याय्य लढा आहे” – सचिन खरात
राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात म्हणाले, “हा नागरिकांच्या जगण्याशी निगडीत प्रश्न आहे. आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढणार आहोत. सरकारने नागरिकांची आर्त हाक ऐकून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.”



