पुणे,दि.२८ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणताना त्यांच्या पाठीवर दप्तरांचा बोजा वाढणार नाही आणि शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शिवाजीनगर येथे शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक शोभा खंदारे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक व इतर अधिकारी उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, महिला व बालविकास विभागाकडून लहान मुलांसाठी कोणते उपक्रम राबविता येतील याची चाचपणी करावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणात्मक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षण सेवा सप्ताह उत्तम रितीने राबवावा. सर्व शाळांना इंटरनेट जोडणी असावी. जेथे इंटरनेट जोडणी नसेल तेथील प्रस्ताव सादर करावा. दुर्गम भागात उपग्रह कनेक्टिव्हिटी घ्यावी. त्यामुळे शाळेत ऑनलाईन कार्यक्रम राबवणे सोपे जाईल.
शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळणे आवश्यक आहे. पोषण आहारात कडधान्य, पौष्टिक तृणधान्य आदींचा समावेश करावा. शिक्षणाधिकाऱ्यांनी वारंवार शाळेला भेटी देऊन पोषण आहाराची पाहणी करावी. विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनाही स्काऊट व गाईडचे प्रशिक्षण देण्यात यावे. मुख्यमंत्री माझी शाळा टप्पा २ व स्वच्छता मॉनिटर टप्पा २ ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.
परसबाग योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कृषी विषयाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. कृषी विषय हा शालेय शिक्षणाचा भाग झाला आहे. परसबागेसाठी कृषी विभागाची समन्वय साधून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. शाळेच्या इमारतीवर पारसबाग असल्यास शाळेचे तापमान कमी होण्यास तसेच मुलांना चांगले पदार्थ मिळण्यास मदत होईल. सर्व शिक्षण उपसंचालक यांनी परसबागेचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी पंप व सोलरसाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करावी.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करावे. यामध्ये महावाचन उत्सव, शिक्षण अभियान, जर्मन भाषा यासारखे व इतर आकर्षक विषय असावेत. विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व योजना मोहिम स्तरावर राबवाव्यात. कोणताही विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिकाऱ्यांनी शिक्षणाचा दर्जा, गणवेश, दप्तरांचा बोजा, वहीतील कोऱ्या पानांचा उपयोग, पोषण आहार, परसबाग योजना, स्काऊट आणि गाईड, शिष्यवर्ती योजना, शाळेतील स्वच्छतागृहाची स्थिती व किचन शेडची वारंवार तपासणी करावी.
शाळेत आनंददायी शनिवार राबविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. यामध्ये प्रसिद्ध कलाकारांची मदत घ्यावी. मॉडेल शाळेत अर्ध इंग्रजी माध्यम अंमलात आणावे. शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. प्रत्येक शाळेने शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन श्री.केसरकर यांनी केले.यावेळी श्री. मांढरे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २, स्वच्छता मॉनिटर टप्पा २, महावाचन अभियान टप्पा २, परसबाग योजना, शिक्षण सेवा सप्ताह, पवित्र पोर्टल, केंद्रप्रमुख भरती, स्वयंअर्थसहाय्यित नवीन शाळांच्या मान्यतेबाबत बृहतआराखडा सद्यस्थिती या विषयांची माहिती दिली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालयाच्या प्रांगणात मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.