आकुर्डी, दि. 7 मे 2024(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – पिंपरी चिंचवड शमधील समस्त लिंगायत समाज सुख-दुःखामध्ये सदैव साथ देणाऱ्या खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड लिंगायत समाजाचा मेळावा आकुर्डी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला.
व्यासपीठावर आमदार उमा खापरे, भाजपाचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे तसेच गुरुराज चरंतीमठ, आण्णाराय बिरादार, एस. बी. पाटील, शिवाजी साखरे, नीलेश बारणे, चंद्रशेखर दलाल, डॉ अशोक नगरकर, दत्तात्रय बहिरवाडे, लक्ष्मण नामदे, गुरुराज कुंभार, बसवराज कनजे, खंडूशेठ बहिरवाडे, संजय दहिहांडे, सोमनाथ हुच्चे आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायण बहिरवाडे म्हणाले की, श्रीरंग बारणे हे नगरसेवक असल्यापासून लिंगायत समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. मोरवाडी येथे लिंगायत दफनभूमीसाठी त्यांनी प्रयत्न केले होते. दिघी येथे दफनभूमीसाठी 23 गुंठे जागा मिळाली असून सांगवी, निगडी, रावेत येथेही जागा प्रस्तावित आहेत. त्यासाठी देखील बारणे यांचा पाठपुरावा सुरू आहे.
निगडी प्राधिकरण येथे महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा उभारण्यासाठी बारणे यांचे मोठे सहकार्य लाभले. पुतळ्याच्या अनावरणासाठी बारणे यांच्यामुळेच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. प्राधिकरणातील मल्लिकार्जुन मंदिर व मोहननगर येथील महादेव मंदिरासाठी देखील बारणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. लिंगायत समाजातील अनेक कुटुंबांशी बारणे यांचे जुने स्नेहसंबंध आहेत, याचा बहिरवाडे यांनी आवर्जून उल्लेख केला.
आमदार उमा खापरे म्हणाल्या की, भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर नेत्याची गरज आहे. मोदी यांनी देशातील महिला, शेतकरी, गोरगरीब, तरुण, आदिवासी अशा सर्वच घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे तेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी देशातील सर्वसामान्यांची भावना आहे.
पिंपरी-चिंचवडमधून बारणे यांना विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास अमित गोरखे यांनी व्यक्त केला. केवळ मोदी यांच्यामुळे भारतात हिंदू स्वाभिमानाने जगू शकत आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणी बरोबरच सर्व प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्रांचा विकास मोदी करीत आहेत, याकडे हेमंत हरहरे यांनी लक्ष वेधले.
मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.