Home ताज्या बातम्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डीईएस पुणे विद्यापीठाचे उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डीईएस पुणे विद्यापीठाचे उद्घाटन

166
0

पुणे, दि.१५ ऑक्टोबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित डीईएस पुणे विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले. स्वायत्त विद्यापीठांनी विश्व, समाज आणि उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबवावेत, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज, एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ.शरद कुंटे, कार्यकारी उपाध्यक्ष  डॉ.रवींद्र आचार्य, सचिव धनंजय कुलकर्णी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणात नव्या शैक्षणिक प्रवाहांचा विचार करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबत देशाच्या वैभवशाली गतकाळाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात अभिमान निर्माण करणारे शिक्षण देणे अपेक्षित आहे. जगाला असलेली कुशल युवा मनुष्यबळाची गरज लक्षात घेता देशाच्या तरुण वर्गाला भाषा, कौशल्य आणि देहबोलीविषयी प्रशिक्षित करणारे शिक्षण स्वायत्त विद्यापीठांनी द्यावे. जगातील नवे शैक्षणिक प्रवाह ओळखून विद्यापीठांनी अभ्यासक्रमाची रचना करणे आवश्यक आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन आणि नावीन्यतेशिवाय देश श्रीमंत होऊ शकणार नाही. गेल्या २ वर्षात असे संशोधन वाढत असून ही समाधानाची बाब आहे. त्यासोबत मातृभाषेत शिक्षण देण्यावरही भर द्यावा. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत त्याला अभ्यासक्रमाची माहिती देणारे सॉफ्टवेअर निर्माण करण्यात येत आहे. यापुढे तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठी भाषेत असतील, अशी माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली. पुढील वर्षी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी न करणाऱ्या विद्यापीठांना संलग्नता नाकारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने प्रयत्न केला आहे. त्यासोबत बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षणावरही भर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानलालसा आणि शोधकवृत्ती निर्माण व्हावी असा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यासोबत सांस्कृतिक-सामाजिक मूल्याच्या जपणूक, समानता आणि स्वावलंबनाचे शिक्षण देण्यावरही भर देण्यात येत आहे.  नव्याने सुरू करण्यात आलेले विद्यापीठ केवळ अध्ययन केंद्र न राहता ज्ञानवान विद्यार्थी, भविष्यातील नेतृत्व घडविणारे होईल, तसेच वैभवशाली भूतकाळ आणि उज्वल भविष्याला जोडणारा सेतू ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिक्षणाच्या माध्यमातून जगात अनुकूल बदल घडवून आणण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. नवे प्रश्न, नवे अन्वेषण, नाविन्यता आणि सुधारणांसाठी विद्यापीठीय शिक्षण विद्यार्थ्यांना प्रेरक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ.जेरे म्हणाले की, पुढील २५ वर्षातील जगाचा विचार करून शैक्षणिक क्षेत्राची रचना करणे आवश्यक आहे. नव्या काळात आवश्यक असणारे मनुष्यबळ हे पारंपरिक व्यवस्थेपेक्षा भिन्न असणार आहे. त्यामुळे विद्यापीठांनी नव्या काळातील आव्हानुसार विद्यार्थ्यांची मानसिकता निर्माण करावी लागेल आणि त्यादृष्टीने अभ्यासक्रमातही बदल करावा लागेल. विद्यापीठातील विद्यार्थी येत्या काळातील आपले सहयोगी असतील असा विचारही विद्यापीठ व्यवस्थापनाने करावा आणि त्या पद्धतीचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. कुंटे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. समाजाच्या बदलत्या गरजेनुसार शिक्षण संस्थेने स्वत:त बदल घडवून आणायला हवा. आजच्या परिस्थितीनुसार व्यावसायिक शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. त्यानुसार संस्थेचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. देशात नैतिकतेने उत्तम काम करणारे, देशासाठी प्रगतीसाठी सर्व शक्ती पणाला लावून कार्यरत राहणारे विद्यार्थी विद्यापीठातून घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुलगुरू डॉ. खांडेकर यांनी विद्यापीठाविषयी माहिती दिली. ज्ञाननिर्मिती केंद्र बहुशाखीय अभ्यासक्रम आणि संशोधनाच्या माध्यमातून  विद्यापीठ समाजासाठी योगदान देईल. विद्यापीठात संशोधनाला चालना देण्यासाठी लाईफ सायन्सेस, सायबर फिजीकल सिस्टीम आणि इंडियन नॉलेज सिस्टीम या तीन संशोन संस्थांही स्थापन करण्यात येत आहेत.  विद्यापीठात इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. समाजातील सर्व घटकांनी विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.आचार्य यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या कार्याची माहिती दिली.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleलोकसभा २०२४ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा
Next articleपुणे ते नागपूर संघर्ष यात्रेत युवकांनी सहभागी व्हावे – आ. रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − four =