Home ताज्या बातम्या बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार पोहरादेवी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री...

बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार पोहरादेवी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

200
0

वाशिम, दि.१२ ऑगस्ट २०२३( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’( वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्था, तसेच नंगारा बोर्ड स्थापन करुन त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोहरादेवी येथे केली.

बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातुच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महंत बाबुसिंग महाराज, खा. भावना गवळी, खा. प्रतापराव जाधव, खा. उमेश जाधव, आ. ॲड. किरण सरनाईक, आ. राजेंद्र पाटणी, आ. संतोष बांगर, आ. इंद्रनील नाईक, आ. संजय रायमुलकर, आ. निलय नाईक, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड आदी उपस्थित होते.

मान्यवरांचे स्वागत पारंपरिक बंजारा पद्धतीने औक्षण करुन व लेझिम नृत्याने करण्यात आले. त्यानंतर देवीस भोग लावण्यात आला व हरदास पठण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पोहरादेवी व उमरी येथील ५९३ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या भुमिपूजन कोनशिलेचे अनावरण झाले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात गोर बंजारा बोलीत करून उपस्थितांना जिंकून घेतले, ते म्हणाले की, पोहरादेवी येथे आल्यावर काशीला आल्यासारखे वाटले. बंजारा समाज हा निसर्गपूजक आणि लढवय्या आहे. शासन हे सामान्य जनतेचे आहे. बंजारा समाजाच्या विकासासाठी नंगारा प्राधिकरण स्थापण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. तसेच वसंतराव नाईक महामंडळालाही निधी कमी पडू देणार नाही. तांडा सुधार योजनेत प्रत्येक तांड्यावर पाणी, रस्ते इ मूलभूत सुविधा विकासासह शाळा, दवाखाने, अंगणवाडी यासारख्या सुविधाही उपलब्ध करून देऊ,असे आश्वासन श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विकासासाठी शासन बंजारा समाजाच्या नेहमी पाठीशी आहे. समाजातील कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ ही संशोधन संस्था स्थापन करण्यात येईल. तसेच नवी मुंबई येथे बंजारा समाज भवन स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच शासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोहरादेवी येथे हेलिपॅडवर आगमन होताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्वप्रथम माता जगदंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री संजय राठोड,ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन,बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे,आमदार राजेंद्र पाटणी, आमदार ऍड.निलय नाईक,बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज,महंत कबिरदास महाराज, शेखर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोहरादेवीचा कायापालट करु – उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गोर बंजारा बोलीत भाषणाची सुरुवात करून उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले की, बंजारा समाजाची काशी असलेल्या या स्थळाचा कायापालट करण्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. ज्याप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काशीचा कायापालट केला. त्याप्रमाणे बंजारा समाजाच्या काशीचा अर्थात पोहरादेवी तीर्थस्थळाचा कायापालट करू.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, संत सेवालाल महाराज यांनी दिलेल्या प्रतिज्ञा ह्या केवळ बंजारा समाजासाठी नव्हे तर समस्त मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. बंजारा हा एक प्राचीन समाज आहे. बंजारा समाजातील महापुरुषांनी त्याग आणि समर्पणाची मोठी परंपरा निर्माण केली आहे. एकेकाळी समृद्ध असणाऱ्या या गोपालक समाजाची आजची हलाखीची स्थिती सुधारण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

तांड्यांचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करून प्रत्येक तांड्यापर्यंत विकास पोहोचवू. बंजारा समाजातील मुला-मुलींचे शिक्षण थांबू नये यासाठी शासन उपाययोजना करेल. ‘नॉन क्रिमिलेयर’ ची अट रद्द करण्याबाबत महाधिवक्त्यांचे मत मागविण्यात येईल. पोहरादेवीचा विकास करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही. गोर बोलीचे संवर्धन करण्यासाठी अकादमी स्थापन करू. शासन संत सेवालाल महाराज यांचे कार्य पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी बंजारा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी उपाययोजना करावी अशी मागणी केली. त्यासाठी बंजारा समाजाचा परिशिष्ट ‘ब’ मध्ये समावेश करावा. नॉन क्रिमिलेयर अट रद्द करावी, समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेप्रमाणे विविध योजना राबवाव्या, तांडा सुधार योजना राबवावी, भूमिहीन समाजबांधवांना जमीनीचे पट्टे द्यावे इ. मागण्या मांडल्या. आ. निलय नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. आ. इंद्रनील नाईक यांनी माजी मंत्री मनोहर नाईक यांचा संदेश वाचून दाखवला. अलका राठोड यांनी आभार मानले.

बंजारा समाजाच्या संस्कृतीचे घडले दर्शन

या कार्यक्रमात उपस्थित बंजारा बांधवांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. अनेक महिला व पुरुष हे पारंपरिक वेशभुषा परिधान करुन आले होते. पारंपरिक वाद्ये व त्या तालावर लोकगीते सामूहिकरीत्या नृत्यासह गायिली गेली. कार्यक्रमासाठी विविध राज्यांतूनही मोठ्या संख्येने बंजारा समाजबांधव उपस्थित होते. आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध गायिका मंगली यांनी सुरेल आवाजात रचना सादर केल्या. त्यावेळी अवघ्या सभामंडपाने ठेका धरला. तसेच देशभरातून आलेल्या अनेक बंजारा कलापथकांनी आपली कला सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

Previous articleपुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी
Next articleविधिमंडळाच्या परिसरात स्व.गणपतराव देशमुख यांचे स्मारक लवकरच उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine − eight =