चिंचवड, दि. २२ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावर देशात हुकूमशाही सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी भाजपाचा पराभवासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याने आम्ही चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे रिपब्लीकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
रहाटणी येथे पत्रकार परिषद घेऊन आनंदराज आंबेडकर यांनी चिंचवड मतदार संघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला. यावेळी मुकुंद रणदिवे, संजय गिरमे, युवराज बनसोडे, सुनील बनसोडे, संदीप रणदिवे, अजय गायकवाड, जयदेव रणदिवे, राजू गायकवाड, संदीप साळुंखे, सचिन सूर्यवंशी, विशाल बेनके, सर्जेराव वाघमारे, सुनील जयस्वाल यांच्याह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, वंचितने कोणालाही पाठींबा दिला असला तरी आंबेडकरी जनता सुज्ञ असल्याने संविधानाला धोका निर्माण करणाऱ्या शक्तींना मदत करणाऱ्या कोणालाही ते मतदान करणार नाहीत. त्यामुळे आंबेडकरी जनतेचा एकमुखी पाठींबा काटे यांनाच राहिल आणि नाना काटे यांच्या विजयासाठी आंबेडकरी जनताच पुढाकार घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशातील न्यायव्यवस्था, सीबीआय, निवडणूक आयोग, इडी यासारख्या स्वायत्त संस्थांचे अस्तित्व संपवून हुकूमशाही आणण्याची प्रक्रिया भारतीय जनता पक्ष राबवत आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे. त्या भूमिकेतून आम्ही काटे यांना पाठींबा देत आहोत, असे ते म्हणाले.
भाजपाच्या संविधानविरोधी भूमिकेला थांबविण्याची सुरुवात चिंचवड मतदारसंघातून होईल. त्यामुळे काटे यांच्या विजयासाठी रिपब्लिकन सेना पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आंबेडकर म्हणाले. यापुढील जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांसह प्रत्येक निवडणुकीत रिपब्लिकन सेना महाविकास आघाडीच्या सोबत असेल, व प्रत्येक ठिकाणी भाजपचा पराभव होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
लेखी पत्र देत पाठींबा,रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पाठींब्याचे लेखी पत्र नाना काटे यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी टाळ्याचा कडकडाट करत काटे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.