Home ताज्या बातम्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

86
0

मुंबई, दि. १० जानेवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीचा प्रारंभ होईल. या लोकोत्सवाच्या नियोजनात कुठलीही कमतरता राहणार नाही. यात शासनाचे विविध विभाग सहभागी होतील. लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य राहील,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीमठ येथे होणाऱ्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या नियोजनाबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे मुख्य सचिव मनु कूमार श्रीवास्तव, आमदार महेश शिंदे, विविध विभागांचे सचिव, या लोकोत्सवाचे संकल्पक कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्यासह, संयोजन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

कणेरीमठ (ता. करवीर) येथे २० ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान लोकोत्सव आयोजित कऱण्यात आला आहे. यामध्ये विविध परिषदा, प्रदर्शने आणि चर्चासत्र-परिसंवाद यांचे आयोजन करण्यात येणार आहेत.

पंचमहाभूत लोकोत्सवाच्या नियोजनासाठी पर्यावरण विभाग समन्वयक काम करेल. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे नोडल अधिकारी म्हणून काम करतील. त्यांना सर्व विभाग सहकार्य करतील, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पर्यावरणीय समतोल विषयी जनजागृती ही काळाची गरज आहे. समाजाची गरज आहे. अतिवृष्टी, बर्फ वितळणे या गोष्टीं आपण अनुभवतो आहोत. त्यामुळे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी ही गरज ओळखून या लोकोत्सवाचे नियोजन केले आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पर्यावरण रक्षणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. भारतात जी-२० परिषद होत आहे. या परिषदेचे बोधवाक्यही वसुधैव कुटुम्बकम् असे आहे. भगवान श्रीकृष्ण यांनीही आपल्याला हीच शिकवण दिली आहे. त्यामुळे पंचमहाभूत लोकोत्सव आणि जी-२०चे आयोजन हा योगही जुळून आला आहे. स्वामीजींच्या नियोजनाची, तयारीची चुणूक बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी अनुभवली आहे.

कणेरी मठाच्या माध्यमातून स्वामीजीं अनेक लोकाभिमुख कामे अविरतपणे करत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या लोकोत्सवाच देशभरातून मान्यवर, स्वयंसेवक येणार आहेत. हा लोकोत्सव यशस्वी करण्याची आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. हे समाजासाठी अपेक्षित असलेले, भविष्यातील धोके ओळखून हाती घेतलेले काम आहे. त्यामुळे मनुष्यबळ, लोकोत्सवासाठी पायाभूत सुविधा यापासून ते सर्व बाबींमध्ये शासनाच्या विविध विभागांचा सहभाग राहील. शासन म्हणून सुरवातीपासूनच लोकांसाठी आणि त्यांच्या मनातील आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न राहीले आहेत. या लोकोत्सवातून शासनाचे निर्णयही लोकांपर्यंत पोहचविता येणार आहे. या लोकोत्सवात सर्वांचा सहभाग राहील, असे प्रयत्न व्हावेत. आपल्या गतीमान प्रशासनाचाही यात महत्वाचा सहभाग राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या पंचमहाभूत लोकोत्सवासाठी जिल्हा नियोजन निधीतून पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्धता, विविध विभागांनी आपली दालने उभी करून सहभाग नोंदवणे याबाबतही सूचना केल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, आज या विषयाचे गांभीर्य आपण पाहिले तर संपूर्ण जग ज्या विषयावर विचार करते अशा पर्यावरण संतुलनाच्या विषयावर हा लोकोत्सव होत आहे. हा विषय सर्वसामान्यांपर्यंत या उत्सवाच्या माध्यमातून पोहोचेल, महाराष्ट्र शासनाने या लोकोत्सवासाठी विविध विभागांच्या माध्यमातून तयारी केली आहे. कणेरी मठाच्या वतीने आयोजित ‘लोकोत्सव’ नक्कीच यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे. हा लोकोत्सव असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा या उत्सवात सहभाग आहेच, या लोकोत्सवासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यात येईल, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

यावेळी कृषी, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पशुसंवर्धन, आरोग्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, ऊर्जा विभाग यांच्या सहभागाबाबत बैठकीत माहिती देण्यात आली.
सुरवातीला अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी प्रास्ताविक केले. प्रधान सचिव श्री. दराडे यांनी पुर्वतयारीबाबत सादरीकरण केले.

पंचमहाभूत लोकोत्सवाची व्यापकता…

सात दिवस चालणाऱ्या या लोकोत्सवात एकूण सात विषय ,२५ पेक्षा जास्त राज्यातील लोकांचा सहभाग, ५० पेक्षा जास्त देशातील प्रमुख पाहुणे ,विविध जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त संस्थांचा सहभाग,५०० हून अधिक कुलगुरुंची उपस्थिती, हजारहून अधिक साधू संतांचा सहवास , १५०० शेती अवजारे व इतर वस्तूंची दालने, दहा हजार व्यावसायिकांचा सहभाग , ६५० एकर विस्तीर्ण परिसरात लोकोत्सव होणार आहे. त्यामध्ये २ लाख चौरस फूट जागेत मनोरंजन जत्रा, ३ लाख चौरस फूट जागेवर थ्री डी मॉडेल्स ची मांडणी केली जाईल. सुमारे ४० लाख लोक या पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होतील, असे नियोजन असल्याची माहितीही संयोजकांनी दिली.

Previous articleBreaking News :: पिंपरी-चिंचवड-भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन
Next articleउपमुख्यमंञी फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + twenty =