छत्रपती संभाजीनगर, दिनांक : २४ ऑक्टोबर २०२५ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी) :- शहरातील शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेल्या नोंदणी उपक्रमाच्या विरोधात, तसेच त्या संदर्भात दोन युवकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (शुक्रवारी) छत्रपती संभाजीनगरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
क्रांती चौकातून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर, सिद्धार्थ मोकळे, अमित भुईगळ आदींनी केले. या वेळी “रा.स्व.संघ मुर्दाबाद” आणि “संविधान जिंदाबाद”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सुजात आंबेडकर यांनी सांगितले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानविरोधी भूमिका घेत आहे. म्हणून आम्ही त्यांना तिरंगा आणि भारतीय संविधान भेट देण्यासाठी मोर्चा काढला. मात्र संघाचा एकही प्रतिनिधी ते स्वीकारायला पुढे आला नाही. हे संविधानाचा अपमानच आहे.”
ते पुढे म्हणाले, “शैक्षणिक संकुलात वैचारिक संघटनांची नोंदणी का केली जाते? जर संघाची नोंदणी झालेली असेल, तर त्याचे प्रमाणपत्र दाखवावे.”
मोर्चा जिल्हा बँकेजवळ पोहोचल्यावर पोलिसांनी त्याला थांबवले. त्यानंतर वंचितच्या शिष्टमंडळाने संविधानाची प्रत आणि तिरंगा घेऊन संघ कार्यालयाकडे प्रयत्न केला. मात्र कार्यालयात कोणी उपस्थित नसल्याचे पोलिसांनी सांगितले, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली.
या घटनेमुळे शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवगिरी महाविद्यालयासमोर झालेल्या संघाच्या सदस्य नोंदणीविरोधात विरोध करणाऱ्या राहुल मकासरे आणि विजय वाहुळ या दोन युवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याच पार्श्वभूमीवर हा निषेध मोर्चा काढण्यात आला.
सुजात आंबेडकर यांनी म्हटले की, “मनुवादी विचारांचा प्रसार रोखण्यासाठीच आम्ही हा आवाज उठवला आहे. संघाच्या विरोधात उभं राहणं म्हणजे संविधानाच्या बाजूने उभं राहणं. हा संघर्ष देशभर पोहोचला पाहिजे.”
या मोर्च्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रमुख चौकात वाहतुकीसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.





