
पिंपरी, ४ नोव्हेंबर २०२५ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ११ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. या महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी राज्य निवडणूक आयोगाने पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
ही नेमणूक राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांणी यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे बिहार निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून रवाना होणार असल्याने, त्यांच्या अनुपस्थितीत आरक्षण सोडतीचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेच्या निवडणूक विभागाने आरक्षण सोडतीसाठीची तयारी पूर्ण गतीने सुरू केली असून, संपूर्ण प्रक्रिया डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्यानंतर तयार झालेला अहवाल राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात येईल.
🗳️ पिंपरी चिंचवडमध्ये या सोडतीकडे नागरिक, पक्ष नेते आणि इच्छुक उमेदवारांचे विशेष लक्ष लागले आहे. कारण याच सोडतीवर आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांची दिशा ठरणार आहे.
📍 — प्रजेचा विकास
स्थानिक घडामोडींवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या तुमच्यासाठी!



