
पिंपरी, दि. २३ सप्टेंबर २०२५ (प्रजेचा विकास ऑनलाईन न्यूज प्रतिनिधी):-शिक्षण व समाजसेवा क्षेत्रातील दीर्घकालीन व उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. धनंजय वर्णेकर यांना U-N Certificate of World Record हा मानाचा जागतिक सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. वर्णेकर हे कॅम्ब्रिज ग्रुप ऑफ स्कूल्स, कॅम्ब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री-स्कूल्स, IIBM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, जेट इंडिया एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट तसेच वर्णेकर युनिव्हर्सल फाउंडेशन या नामांकित संस्थांचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. शिक्षण क्षेत्रातील नवकल्पनांमुळे व सामाजिक उपक्रमांमुळे त्यांनी गेली तीन दशके नवे आदर्श घालून दिले आहेत.
महिलांसाठी आणि बेरोजगार युवकांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आयटी प्रशिक्षण, ५०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, तसेच ७०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्रशस्त्रक्रिया व रक्तदान शिबिरांचे आयोजन — या उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने बहाल करण्यात आलेला हा पुरस्कार केवळ डॉ. वर्णेकर यांच्या वैयक्तिक कामगिरीचा नाही तर भारतीय शिक्षण व समाजसेवा क्षेत्राच्या उंचावलेल्या दर्जाचा जागतिक सन्मान असल्याचे मानले जात आहे.





