पिंपरी-चिंचवड,दि २८ ऑक्टोबर २०२६ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- रावेत परिसरातील सेक्टर २३ मधील सर्वे क्रमांक १५५, १५६, १५८ आणि १७७ येथे प्रस्तावित असलेल्या वेस्ट टू एनर्जी (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पाला स्थानिक पातळीवर विरोध सुरू झाला आहे. या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी त्यांचे पती तथा युवा सेना प्रमुख, पिंपरी-चिंचवड-मावळचे राजेंद्र तरस उपस्थित होते.
रावेत परिसरात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्यावर, पर्यावरणावर आणि परिसरातील सुरक्षेवर संभाव्य परिणाम होऊ शकतात, अशी भूमिका नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी निवेदनातून मांडली आहे. स्थानिक नागरिकांच्या भावना आणि जनहिताचा विचार करून महानगरपालिकेने या प्रस्तावाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोशीतील प्रकल्पाचा अनुभव लक्षात घेण्याची मागणी
मोशी येथे उभारण्यात आलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कार्यक्षमतेबाबत आणि तांत्रिक अडचणींबाबत प्रश्न उपस्थित करत, विद्यमान प्रकल्पातील समस्या पूर्णपणे दूर होण्यापूर्वी आणखी एक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मोशीतील प्रकल्प सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतरच नवीन प्रकल्पाचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरीच्या जवळ असल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
प्रस्तावित प्रकल्पाच्या परिसरात देहूरोड येथील संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ऑर्डनन्स फॅक्टरी असल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या परिसरात प्रकल्प उभारण्यापूर्वी संरक्षण विभागाची भूमिका, लागू सुरक्षा मानके आणि संभाव्य धोके यांचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे तरस यांनी म्हटले आहे.
प्रदूषण, दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता
रावेत परिसरात वाढत्या निवासी वसाहती, शैक्षणिक संस्था आणि ऐतिहासिक दुर्गा टेकडी असल्याने प्रस्तावित प्रकल्पाच्या संभाव्य परिणामांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे. वायू प्रदूषण, दुर्गंधी, ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम यांचे स्वतंत्रपणे मूल्यमापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पर्यावरणीय अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी
नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी आयुक्तांकडे सादर केलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :
- रावेत येथील प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी.
- मोशी येथील विद्यमान प्रकल्प पूर्ण क्षमतेने आणि सुरक्षितपणे कार्यरत झाल्यानंतरच नवीन प्रकल्पाचा विचार करावा.
- स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, पर्यावरणतज्ज्ञ आणि संरक्षण विभागाशी सविस्तर चर्चा करावी.
- प्रकल्पाचा पर्यावरणीय व सामाजिक परिणाम अहवाल (EIA) सार्वजनिक करून नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवाव्यात.
- नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि परिसराची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा.
मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास जनआंदोलनाचा इशारा
या निवेदनातील मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास संबंधित परिसरात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी दिला आहे.
आता महानगरपालिका प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन प्रस्तावित प्रकल्पाबाबत काय भूमिका घेते, याकडे रावेतसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



